निमोणे : शिरूर तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. तालुक्यातील निमोणे येथे मजुरी करण्यासाठी आलेल्या बिहार येथील कुटुंबातील दोन वर्षीय चिमुकलीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जान्हवी कुमारी विमलकुमार राम असं मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (दि. 29) साडे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत मुलीचे वडील विमलकुमार बहादूर राम (वय-27, सध्या रा. काळेवस्ती रोड, निमोणे, ता. शिरुर, जि. पुणे, मूळ रा. दिघली, हसनपूर वाॅर्ड 33 किसनगंज, बिहार) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. २९) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास फिर्यादी हे त्यांची पत्नी व मुलगी असे घरी होते. त्यावेळी मुलगी जान्हवी कुमारी ही घराच्या बाहेर अंगणात मांजरासोबत खेळत होती.
त्यावेळी अचानक मुलीचा रडण्याचा आवाज आल्याने विमलकुमार राम आणि त्यांची पत्नी दोघेही घरातून बाहेर आले. त्यावेळी सापाने मुलीला डाव्या पायाला दंश करताना त्यांनी पाहिले. त्यानंतर मुलीला तातडीने उपचारासाठी शिरूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे घोषित केले. पुढील तपास शिरूर पोलिस करत आहेत.