-ओमकार भोरडे
तळेगाव ढमढेरे : निमगाव म्हाळुंगीत बिबट्याच्या हल्ल्यात गायीचा मृत्यू झाला आहे. निमगाव म्हाळुंगी ता. शिरुर येथील काळे वस्ती येथे पहाटेच्या सुमारास अरुणा काळे या शेतकरी महिलेच्या गोठ्यात शेजारी बांधलेल्या गायीवर बिबट्याने हल्ला करून ठार केले. या सर्व घटनेत शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. ही घटना घडल्याने शेतकरी भयभीत झाले असून येथे पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
निमगाव म्हाळुंगी ता. शिरुर येथील काळे वस्ती येथे काळे कुटुंबीय रात्रीच्या सुमारास झोपलेले असताना, पहाटेच्या सुमारास कुत्र्यांच्या भुंकण्याचा तसेच जनावरांच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागल्याने काळे कुटुंबीय घरातून बाहेर आले. त्यांना बिबट्या पळून जाताना दिसला, मात्र यावेळी एक गाय ठार झालेली होती, याबाबतची माहिती वनपाल गौरी हिंगणे यांना मिळताच वनरक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू टीमने घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
यावेळी इतर ग्रामस्थ उपस्थित होते, तर यावेळी येथे पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. लवकरच येथे पिंजरा लावण्याची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे वनरक्षक प्रमोद पाटील यांनी सांगितले.