पुणे : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला असून पुढील तीन ते चार दिवस हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गुजरात किनारपट्टीवर घोंघावत असलेल्या असना चक्रीवादळामुळे राज्यात पुन्हा पाऊस वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यभरात सर्वत्र 4 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज रविवार, 1 सप्टेंबर रोजी विदर्भातील चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
राज्यात पुढील दोन-चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गुजरातमध्ये आलेल्या चक्रीवादळासह बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पुन्हा मान्सून सक्रीय झाला आहे. त्यामुळे विदर्भातील काही भागांत आज (रविवारी) अतिवृष्टी, तर उर्वरित राज्यात मुसळधार ते मध्यम पाऊस होणार आहे. मुंबई-पुणे शहरांत 1 ते 4 सप्टेंबरपर्यंत विजांच्या कडकडाटांसह पाऊस होणार असल्याची माहिती हवामान विभागाचे निवृत्त विभागप्रमुख अनुपम कश्यपी यांनी दिली आहे.
सरासरीहून अधिक पावसाची शक्यता..
सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून सप्टेंबर महिन्यात देशात 109 टक्क्यांपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. विदर्भ, कोकणासह महाराष्ट्राच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
‘या’ भागात पावसाची शक्यता..
कोकणात आज हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला असून कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं पुढील दोन ते तीन दिवस महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
परभणी जोरदार पावसाची हजेरी..
परभणीत पहाटेपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे काल दुपारनंतर वादळी वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. यामुळे अनेक भागात जलमयस्थिती निर्माण झाली. तर, अनेकांच्या शेतातील भात पीक जमीनदोस्त झालं आहे. या पावसाचा फटका ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बसला आहे.