मुंबई : मुंबईमधून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. कानाचं ऑपरेशन करण्यासाठी रुग्णालयात गेलेल्या महिला पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मुबईच्या अंधेरी पश्चिम लोखंडवाला परिसरात ही घटना घडली आहे. गौरी सुभाष पाटील असं मृत पोलीस कर्मचारी महिलेचं नाव आहे. या मुंबई पोलीस दलात कार्यरत होत्या. या घटनेनं सर्वांच्या पायाखालची जमिन हादरली आहे.
नेमकं काय घडलं?
मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या महिला कॉन्स्टेबल गौरी पाटील यांना कानाचा त्रास जाणवत होता. त्यानंतर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला. डॉक्टरांनी त्यांना कानाचं ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार कॉन्स्टेबल गौरी पाटील या ऑपरेशनसाठी रुग्णालयात दाखल झाल्या. ठरल्याप्रमाणे त्यांना ऑपरेशनसाठी ओटीमध्ये नेण्यात आलं. त्यानंतर ऑपरेशनसाठी त्यांना भुलीचं इंजेक्शन दिलं. भुलीचं इंजेक्शन दिल्यानंतर कॉन्स्टेबल गौरी पाटील यांची प्रकृती आणखीनच खालवली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनं पोलीस दलात प्रचंड खळबळ माजली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. कानाच्या ऑपरेशन दरम्यान डॉक्टरांकडून चुकीचं इंजेक्शन दिल्याने महिला पोलीस शिपायाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा पोलिसांचा आरोप आहे. पोलिसांच्या आरोपावर हॉस्पिटल बोलण्यास नकार देत आहे. याप्रकरणी आंबोली पोलिसांनी एडीआर दाखल केला असून अधिक तपास करत आहे.