पिंपरी चिंचवड : मालवणच्या राजकोट किल्ल्यावर बांधण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रात वातावरण पेटून उठले होते. नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळलेला असतानाच आता पिंपरी चिंचवडमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून पिंपरी चिंचवडमध्ये उभारला जात असलेला छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला उभारणीआधीच तडे गेले आहेत, त्यामुळे पुतळा उभारणीचं काम निकृष्ट दर्जाचं होतंय का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये शंभू सृष्टी..
पिंपरी चिंचवडमध्ये शंभू सृष्टी उभारली जात असून या शंभू सृष्टीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा सुमारे 100 फूट उंच कास्य धातूमध्ये उभारला जाणार आहे. हा पुतळा भव्य असून काही शेकडो टन वजनाचा आहे, मात्र हा पुतळा ज्या पायावर उभारला जातोय त्या पायांनाच आता तडे गेले आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेने तब्बल 5 कोटी रुपये खर्च करून पुतळ्यासाठी बांधलेला चौथराही रिकामाच पडून आहे. या चौथऱ्याचे 37 टक्के बांधकाम पूर्ण झाल्यावर अचानक महापालिका प्रशासनाला साक्षात्कार झाला आणि चौथऱ्यावर उभा केला जाणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याची जागा बदलण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.
आता चौथऱ्यावर छत्रपती संभाजी महाराजांच्याऐवजी त्यांचे मामा सरसेनापती हांबिरराव मोहिते यांचा पुतळा उभारला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी महापालिकेचे प्रशासक तसंच आयुक्त शेखर सिंह यांना विचारलं असता त्यांनी कानावर हात ठेवत पुतळा उभारणीच्या कामात काही भ्रष्टाचार झाला का? याबाबत नो कमेंट म्हणत बोलण्यास नकार दिला आहे.