मुंबई : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने राज्य सरकारने बदल्यांचा सपाटा लावला आहे. त्यानुसार गुरुवारी सात सनदी अधिकाऱ्यांची बदली करण्याचा शासन आदेश सामान्य प्रशासन विभागाने काढले आहेत. यापूर्वी १७ सनदी अधिकाऱ्यांची नुकतीच बदली केली होती.
विधानसभेच्या आगामी निवडणुका जवळ आल्याने राज्यात सध्या बदल्यांचे वारे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस दलासह सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू आहे. गुरुवारीदेखील सात अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. त्यानुसार सोलापूरच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्यावर पुण्यातील स्मार्ट सिटी विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा भार सोपवला, तर सौम्या शर्मा चांडक यांची स्मार्ट सिटी नागपूरच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती केली. तर अभिनव गोयल यांची हिंगोलीचे नवे जिल्हाधिकारी म्हणून निवड केली.
विनायक महामुनी यांची नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून, सतीशकुमार खडके यांची जिल्हा परिषदेच्या बीडच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी, कुलदीप जंगम हे सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. तर प्रदीपकुमार डांगे यांची नवी मुंबईतील कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता आयुक्तपदी नियुक्ती केल्याचे सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.