केज : मित्राच्या पत्नीला ‘तू मला खूप आवडतेस’ म्हणत एकाने बळजबरीने अत्याचार केला. तालुक्यातील एका गावात बुधवारी (दि.२८) रात्री १ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. पीडितेच्या तक्रारीवरुन आरोपीविरुद्ध केज ठाण्यात गुन्हा नोंद झाला.
पीडित विवाहिता तिचा पती, एक मुलगा व सासूसोबत केज तालुक्यातील एका गावात राहते. मंगळवारी (दि.२७) तिचा पती ट्रक घेऊन बाहेरगावी गेलेला होता. त्यामुळे घरी त्याची पत्नी व वृद्ध आई होती. गावात हरिनाम सप्ताह सुरू असल्याने तिची सासू जेवण आटोपून मंदिरात जप करण्यासाठी गेली होती. घरी विवाहिता एकटीच झोपलेली होती. बुधवारी रात्री १ ते १:३० वाजेच्या सुमारास ती शौचास घराबाहेर गेली असताना तिच्या पतीचा मित्र असलेला आरोपीने संधी साधून घरात जावून पलंगावर बसला.
विवाहिता घरात परतल्यानंतर तिने ‘तू घरात का आलास?, अशी विचारणा केली असता त्याने ‘तू मला आवडतेस’ म्हणत त्याने तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडितेने आरडाओरडा करताच त्याने हा प्रकार कुणाला सांगितला तर जीवे मारेल अशी धमकी देवून पलायन केले. दरम्यान नंतर सासू घरी परतल्यावर पीडितेने तिच्यावर बेतलेला प्रसंग तिच्या वडिलांना कळवला. पीडितेच्या तक्रारीवरून केज ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद झाला असून तपास पिंक पथकाचे उपनिरीक्षक प्रकाश शेळके करत आहेत.