संतोष पवार
पळसदेव : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य द्वारा जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मारकड कुस्ती केंद्र इंदापूर येथे २८ ऑगस्ट रोजी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या तालुकास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत भिगवण येथील साईनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या शाहिद सलीम मुलाणी या मल्लाने 48 किलो वजन गटात इंदापूर तालुक्यातुन प्रथम क्रमांक मिळवला आहे.
शाहिद मुलाणी जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्याची माहिती विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुचिता साळुंके यांनी दिली. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळाकडे लक्ष देणे गरजेचे असून विद्यार्थ्यांच्या खेळ कौशल्यास वाव मिळाल्यास राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडतील, असे मत शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. चंद्रकांत खानावरे यांनी व्यक्त केले.
दरम्यान विजेत्या कुस्तीपटुचा शिक्षण संस्थेच्या व विद्यालयाच्या वतीने रोख रक्कम व गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी साईनाथ शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. चंद्रकांत खानावरे, विद्यमान अध्यक्ष डॉ. अमोल खानावरे, संचालक सचिन बोगावत, धनाजी थोरात, जय मल्हार तालीमचे वस्ताद दत्ता गायकवाड, अजय कोथमिरे, सलिम मुलाणी, सुनील गोरे मुख्याध्यापिका सुचिता साळुंके आदिंसह शिक्षक शिक्षकेत्तर विद्यार्थी उपस्थित होते.