पुणे : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरला दिल्ली उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. पूजा खेडकरचे अटकेपासूनचे संरक्षण दिल्ली उच्च न्यायालयाने आज गुरुवारी 5 सप्टेंबरपर्यंत वाढवले आहे. आज अटकपूर्व जामिनाच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा निर्णय सुनावला आहे.
युपीएससीच्या तिच्यावरील आरोपांबाबत दिल्ली उच्च न्यायालयात दिलेल्या उत्तरात पूजा खेडकर म्हणाल्या की, एकदा प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून निवड आणि नियुक्ती झाल्यानंतर युपीएससीला आपली उमेदवारी अपात्र ठरवण्याचा अधिकार नसल्याचे म्हणत आपल्या नावात कोणतीही फेरफार केली नसल्याची बाब तिने न्यायालयापुढे मांडली.
युपीएससी आणि दिल्ली पोलिसांच्या तक्रारीवर उत्तर देण्यासाठी न्यायालयाने पूजा खेडकरला वेळ दिला आहे. दिल्ली उच्च न्यायालयामध्ये युपीएससीने पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करत याचिका दाखल केली होती. यामध्ये तिने आयोगासह जनतेची फसवणूक केल्याची बाब अधोरेखित करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांनीही अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी केली होती. कारण पूजा खेडकरला दिलेला कोणताही दिलासा तपासात अडथळा आणेल आणि या प्रकरणाचा जनतेवर मोठा परिणाम होईल.
केंद्रीय लोकसेवा आयोग 2022 दरम्यानच्या अर्जात चुकीची माहिती दिल्याचा आरोप पूजा खेडकरवर करण्यात आला होता. ज्यानंतर 31 जुलै रोजी UPSC ने तिची उमेदवारी रद्द केली होती. युपीएससीने न्यायालयात दाखल केलेल्या उत्तरानुसार पूजा खेडकरची कोठडीतच चौकशी करणे महत्त्वाचे आहे. त्यातूनच फसवणूक उघडकीस येऊ शकते. ज्यामुळे हा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. परंतु न्यायालयाने मात्र पूजा खेडकरच्या बाजूने निकाल देत तिला दिलासा दिला आहे.