पुणे : काही दिवसांवरच गणेशोत्सव सण येत आहे. ऐन गणेशोत्सव तोंडावर असताना पुण्यातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून महापालिकेने पुण्यात 2 हजार 909 सीसीटीव्ही बसविले मात्र, यातील 1 हजार 54 सीसीटीव्ही बंद आहेत. त्यामुळे शहरातील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
विद्युत विभागाने पुणे शहरात 2 हजार 909 सीसीटीव्ही बसविले आहेत. यापैकी 1 हजार 855 सीसीटीव्ही कॅमेरे सुरु आहेत. तर 1 हजार 54 सीसीटीव्ही बंद आहेत. शहरात कोयता गॅंगचे हल्ले, खून, मारामा-या, घरफोड्या, महिलांवर होणारे अत्याचार असे प्रकार वारंवार घडत आहेत. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. असे असताना सीसीटीव्ही बंद असल्याने गुन्हेगांराना मोकळीक भेटणार आहे.
शहरात स्ट्रीट क्राईम झपाट्याने वाढत आहे. या गुन्ह्याच्या तपासात पोलीसांना सीसीटीव्हीची मोठी मदत होते. तसेच यापूर्वी खुनासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींची ओळख पटवण्यासाठी देखील सीसीटीव्हीची मदत झाल्याच्या अनेक नोंदी आहेत. त्यामुळे शहरातील प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असणे आवश्यक आहे.