ठाणे : राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या घटना तर घडत आहेत. याशिवाय, महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ होत असल्याचे म्हटले जात आहे. असे असताना भिवंडी येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील महापालिकेच्या एका शाळेतील शिक्षक विद्यार्थिनींना वह्या तपासण्याचा बहाण्याने बोलावून त्यांना अश्लील व्हिडिओ दाखवायचा. हा प्रकार 26 ऑगस्ट रोजी दुपारी मधल्या सुट्टी दरम्यान घडला.
मुइझम्मील हुसेन शबीर अहमद शेख (वय 36) असं अटक करण्यात आलेल्या शिक्षक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत महापालिकेची उर्दू शाळा आहे. या शाळेत सातवीत शिक्षण घेत असलेल्या मुलीला आरोपीने वही तपासण्याच्या बहाण्याने जवळ बोलावले. यावेळी त्याने मुलीची वही तपासण्या ऐवजी तिला मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवला.
पीडित मुलगी 26 ऑगस्ट रोजी दुपारी मधली सुट्टी झाल्यानंतर शाळेच्या शौचालयात जाऊन आली. ही मुलगी सुमारे दोन तास उशिराने वर्गात गेल्यामुळे वर्ग मॉनिटरने तिची बॅग शिक्षक कक्षात ठेवली होती. त्यामुळे आपली बॅग घेण्यासाठी शिक्षक वर्गात गेली. त्यावेळी शिक्षकांनी तिला पालकांना घेऊन येण्यासाठी सांगितलं. मुलीने 28 तारखेला पालकांना शाळेत नेले. मात्र, तिने उशीर का झाला याचे कारण सांगितले नाही. पालकांनी मुलीला घरी नेऊन तिला विश्वासात घेतले. यावेळी तिने झालेला सर्व प्रकार सांगितला.
शिक्षक मुजम्मिल अन्सारी मुलींना नोटबुक चेक करण्याच्या बहाण्याने बोलावतात आणि अश्लील व्हिडीओ दाखवतात. त्यावेळी मुलींचा दुपट्टा खेचतात, तसेच मोबाईल व्हिडीओ बाबत कोणालाही काही सांगितलं तर तुम्हाला वर्गात मारेन अशी धमकी देखील या पीडित मुलीला देण्यात आली होती.
हे प्रकरण समोर आल्यानंतर पालकांनी आरोपी शिक्षकाविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपीला अटक करण्यात आली आहे.