नवी दिल्ली: उत्तर प्रदेशातील देवरिया येथील बरियारपूर पोलीस स्टेशन परिसरात राहणारी एक तरुणी दुसऱ्या समाजातील तिच्या प्रियकराशी लग्न करण्याच्या निर्णयावर ठाम होती. त्यानंतर मुलीच्या भावाने रागाच्या भरात विष प्राशन केले. हा सगळा प्रकार पोलीस ठाण्याच्या आत घडला, जिथे भाऊ त्याच्या आईसोबत बहिणीच्या मागे गेला होता. आई आणि भावाने पोलिस ठाण्यात मुलीची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला. पण ती तिच्या प्रियकराशी लग्न करण्यावर ठाम राहिली.
बहिण आपल्या निर्णयापासून मागे हटली नाही, तेव्हा भावाने पोलिस ठाण्यात सर्वांसमोर विष प्राशन केले. यामुळे पोलिसही हैराण झाले. पोलिसांनी त्वरीत मुलाला देवरियाच्या मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल केले. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण बरियारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील आहे. येथे राहणाऱ्या तरुणीचे दुसऱ्या समाजातील तरुणावर प्रेम होते.
बराच वेळ घरच्यांना याची माहिती नव्हती. यादरम्यान त्यांनी मुलीचे लग्न करण्याचा निर्णय घेतला. नोव्हेंबर महिन्यात लग्नाची तारीखही निश्चित झाली होती. घरात सुरु झालेली लग्नाची तयारी पाहून मुलगी अस्वस्थ झाली. तिने आपल्या प्रियकराबद्दल तिच्या घरच्यांशी बोलून त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र तिचे कुटुंबीय त्यासाठी तयार नव्हते. घरच्यांनी नकार दिल्याने तरुणीने मंगळवारी पोलिस ठाणे गाठले आणि ती तिच्या प्रियकराशी लग्न करण्यावर ठाम असल्याचे सांगितले.
मुलीला समजावण्याचा प्रयत्न
त्याच्या मागोमाग आलेल्या भावाने आणि आईने तिला समजवण्याचा खूप प्रयत्न केला. मुलीने निर्णय न बदल्याने भावाने विष प्राशन केले. यानंतर पोलीस ठाण्यात एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी या तरुणाला तात्काळ वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले, तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सीओ सालेमपूर दीपक शुक्ला यांनी रुग्णालयात पोहोचून तरुणाची प्रकृती जाणून घेतली. या घटनेनंतर पोलिसांनी तरुणाची बहीण आणि तिच्या प्रियकराला पोलीस ठाण्यात नेले. सीओ सलेमपूर दीपक शुक्ला यांनी सांगितले की, तरुणी अजूनही दुसऱ्या समाजातील प्रियकराशी लग्न करण्याचा आग्रह धरत आहे. तो न पटल्याने भावाने विष प्राशन केले. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे.