पुणे : पुण्यातील हडपसर परिसरात दारूच्या नसेत भरधाव वेगात रिक्षा चालकाने महिलेला उडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मद्यपान करून भरधाव वेगात रिक्षा चालवून चालकाने महिलेला उडवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना २५ ऑगस्ट रोजी शेवाळवाडी भाजी मार्केटच्या समोर घडली आहे. सारिका राजेंद्र चव्हाण (वय-३८, रा. लोणी काळभोर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी गुन्हा दखल करून रिक्षा चालकाला अटक केली आहे.
याबाबत अमोल सज्जन कानगुडे (वय-३६, रा. वाडगे वस्ती, लोणी काळभोर) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून आनंद रविंद्र दोडके (वय-४०, रा. हिंगणे मळा, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय होता. त्या शेवांळेवाडी येथे भाजी विक्री करत होत्या. त्यावेळी आरोपी रिक्षा चालक आनंद दोडके हा दारुच्या नशेत भरधाव वेगात रिक्षा चालवत हडपसरवरुन लोणीकडे जात असताना त्याने भाजी विक्री करणाऱ्या सारिका चव्हाण यांना जोरदार धडक दिली. या अपघातात सारिका या गंभीर जखमी झाल्या.
त्यांच्या मेंदूला मार लागला होता. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गांधले करीत आहेत.