अहमदनगर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर शरद पवारांनी कंबर कसल्याचं दिसून येत आहे. अशात भाजपचे नेते शरद पवारांच्या भेटी घेत आहेत. तर काहीजण लवकरच राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं चित्र आहे. विधानसभेचे वारे वाहू लागल्यापासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. अशातच आता अहमदनगरमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. नगरमधील भाजपचे बडे नेते विवेक कोल्हे हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असून आज ते पुण्यामध्ये शरद पवार यांची भेट घेणार आहेत.
एकीकडे विधानसभेची मोर्चबांधणी सुरू असतानाच अहमदनगरमध्ये शरद पवार भाजपाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहेत. वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटच्या गव्हर्निंग कौन्सिलची पुण्यातील मांजरी येथे बैठक पार पडत आहे. या बैठकीदरम्यान कोपरगाव विधानसभेच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे पुत्र भाजप नेते विवेक कोल्हे यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे. या भेटीनंतर आता पुन्हा एकदा विवेक कोल्हे हे शरद पवार यांच्या गटामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत.
घड्याळ विरुद्ध तुतारी आमनेसामने ?
गणेश कारखाना निवडणुकीत विखे पाटलांचा पराभव केल्यानंतर विवेक कोल्हे राज्यभरात चर्चेत आले होते. नुकत्याच झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीतही त्यांनी भाजपला आव्हान देत अपक्ष निवडणूक लढवली होती. त्यामुळे कोल्हे आणि भाजपमध्ये दुरावा वाढल्याची चर्चा सुरु आहे. दुसरीकडे कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांनी विद्यमान आमदार आशुतोष काळे यांची उमेदवारी निश्चित केली आहे. त्यामुळे देखील कोल्हे यांची राजकीय अडचण झाली असून ते तुतारी घेऊन विधानसभा लढण्यास इच्छुक आहेत. दरम्यान, विवेक कोल्हे शरद पवार गटात गेले तर कोपरगावमध्ये घड्याळ विरुद्ध तुतारी असा सामना रंगणार आहे.