पुणे : दहीहंडीनिमित्त शहर तसेच उपनगरांत आज (दि. २७ ऑगस्ट) मोठा पोलिस बंदोबस्त तैण्यात करण्यात आला आहे. स्थानिक पोलिस ठाणी, मुख्यालय, गुन्हे शाखा, एसआरपीएफ कंपनी यांच्यासह होमगार्ड असा तीन हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. मध्य भागासह उपनगरांत गेल्या काही वर्षांपासून दहीहंडी मोठ्या प्रमाणावर साजरी करण्यात येत आहे.
दरम्यान, दहीहंडीमध्ये लेसर बीमचा वापर तसेच उच्चक्षमतेच्या डीजेचा वापर करण्याचे प्रमाण वाढतच आहेत. तसेच दहीहंडीनिमित्त शहरातील अनेक मंडळांनी खास लेसर शो आयोजित केले आहेत. तसेच मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, दिल्लीतील डीजे पुण्यात आणले जातात. गेल्या विसर्जन मिरवणुकीत लेसर बीमचा वापर मोठ्या प्रमाणावर केला होता. त्यांच्या प्रकाशझोतांमुळे अनेकांना त्रास झाला होता. काहींच्या डोळ्यांना इजा झाली होती.
डीजेचा वापर मोठ्या प्रमाावर करण्यात आल्याच्या तक्रारी केल्या होत्या. पोलिस आयुक्तालयात मानाच्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच आयोजित केली होती. या बैठकीत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी यंदा विसर्जन मिरवणुकीत वापरण्यात येणाऱ्या लेसर बीम दिव्यांवर बंदीचे आदेश दिले आहेत.