पुणे : पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल याच्या मुलाबरोबर असलेल्या दोन मित्रांच्या रक्ताच्या नमुन्यात बदल केल्याप्रकरणी अटक केलेल्या दोघांंना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश अतिरक्त सत्र न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांनी सोमवारी दिले आहेत.
आदित्य अविनाश सूद (वय-५२, रा. सोपानबाग सोसायटी, बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी), आशिष सतीश मित्तल (वय-३७, रा. स्काय वेलवेडर सोसायटी, विमाननगर) अशी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दरम्यान, आरोपींच्या जामिनासाठी बुधवारी अर्ज करण्यात येणार आहे.
दोघांची पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना (दि. २६) सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकील अनिल कुंभार म्हणाले, गुन्हा घडल्यानंतर गुन्ह्यातील पुरावा नष्ट करणे, शासकीय दस्तऐवजात फेरफार करणे, गुन्ह्यातील अल्पवयीन मुलाला न्यायालयीन प्रक्रियेमध्ये बेकायदेशीरपणे सोडविण्यासाठी लाचेच्या स्वरूपात आर्थिक व्यवहार करणे, असे प्रकार झाले आहेत. यामध्ये अटक आरोपींच्या मदतीने आणखी काही आरोपी निष्पन्न होत आहेत. याबाबत त्यांच्याकडे सखोल चौकशी करायची आहे. त्यासाठी दोन्ही आरोपींना पाच दिवस पोलिस कोठडी देण्यात यावी.
आरोपींच्यावतीने ॲड. अबिद मुलाणी, ॲड. सिओल शहा, ॲड. ध्वनी शहा, ॲड. विनीत शेट्टी, ॲड. वेंकटेश शेवाळे, ॲड. आर. व्ही. कातोरे यांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने दोन्ही आरोपींची येरवडा कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले. आरोपींच्या वतीने २८ ऑगस्ट रोजी जामीन मिळवण्यासाठी अर्ज करण्यात येणार आहे, असे बचाव पक्षाच्या वकिलांनी सांगितले आहे.