अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : शिरुर शहरातील बाबुरावनगर येथून पोलीस कर्मचारी योगेश आनंदा गुंड यांची मारुती सुझुकी कंपनीची ईरटीका हि चारचाकी गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली आहे. त्यामुळे जर पोलिसांच्याच गाड्या सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य नागरिकांचे काय…? असा सवाल आता शिरुर शहरातील नागरीक उपस्थित करत आहेत.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि 25) ऑगस्ट रोजी पहाटे 3:58 च्या सुमारास शिरुर शहरातील बाबुरावनगर हद्दीत महेंद्र हाईट्स या बिल्डींगच्या बाजुला रोडच्या कडेला लॉक करुन पार्क केलेली योगेश गुंड यांची मारुती सुझुकी कंपनीची इर्टिगा कार नं. एम एच 12 टिडी 0702 (MH12TD 0702) ही चारचाकी गाडी स्विप्ट डिझायर कार मधुन आलेल्या दोन अनोळखी इसमांनी गाडीचे लॉक तोडुन चोरी करुन घेवुन गेले आहेत. या घटनेचा पुढील तपास शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार जगताप हे करत आहे.
शिरुर पोलिसांना चोरांचे आव्हान…?
शिरुर शहरातुन आता पोलिसाची गाडी चोरीला गेल्यामुळे या चोऱ्या रोखणे पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. शिरुर पोलीस स्टेशनची हद्द खूप मोठी असुन टाकळी हाजी येथे स्वतंत्र पोलीस ठाणे व्हावे ही बऱ्याच दिवसाची मागणी सरकारकडे प्रलंबित आहे. राजकीय नेत्यांनी ही गरज ओळखून या ठिकाणी स्वतंत्र पोलीस स्टेशन होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शिरुर पोलिस स्टेशनमध्ये अपुरा कर्मचारी स्टाफ असल्याने यामुळे पोलीस बांधवांवर काम करताना प्रचंड ताण येत आहे. यामुळे गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून शहरासह ग्रामीण भागात अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला आहे.