पिंपरी : साताऱ्यावरून पुण्यात येऊन एका अवलियाने यू ट्युबवरुन दुचाकी चोरीचे प्रशिक्षण घेऊन एक-दोन नव्हे तर तब्बल १८ दुचाकी चोरी केल्या आहेत. याप्रकरणी एका तरुणाला गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने अटक केली आहे. अभिषेक मल्लाप्पा हावळेकर (वय-21, रा. आंबेठाण, चाकण. मूळगाव साई दर्शन कॉलनी, शाहूपुरी, सातारा) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. तसेच त्याच्या अल्पवयीन साथीदाराला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 9 ऑगस्ट रोजी एकाच सोसायटीमधून दोन दुचाकी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली होती. या गुन्ह्याच्या तपासात वाहन चोरी करणारे आरोपी कोणत्या मार्गाने आले आणि गेले याचा तपास करण्यासाठी 80 सीसीटीव्ही फुटेज तपासले. यावेळी या दोन चोरट्यांनी ही वाहने चोरी केल्याचे आढळून आले. दरम्यान, पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर अभिषेक हावळेकर या आरोपीला अटक केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
अभिषेक हावळेकर याची कसून चौकशी केली असता त्याने मागील काही महिन्यात हिंजवडी येथून सहा, वाकड, सांगवी, पिंपरी, चिंचवड, चंदननगर, भारती विद्यापीठ, सताऱ्यातून प्रत्येकी एक, चतुश्रुंगीमधून तीन दुचाकी चोरल्याचे कबूल केले. या कारवाईमुळे 16 चोरीचे गुन्हे उघकीस आले आहेत. पुढील तपास पोलिस करत आहेत.