पुणे : पुण्यातील हडपसर परिसरात भांडण सोडविणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकावर कोयता हल्ला करुन फरार झालेल्या सराईत गुंडाना सोलापूर परिसरातून अटक करण्यात आली आहे. निहालसिंग मन्नूसिंग टाक (वय-19, रा. तुळजाभवानी वसाहत, हडपसर), राहुलसिंग उर्फ राहुल्या रवींद्रसिंग भोंड (वय-20, रा. हडपसर), अमरसिंग जग्गरसिंग टाक (वय-23) अशी अटक करण्यात आलेल्या सराईतांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर भागातील ससाणेनगर परिसरात रविवारी (दि. २५) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास दोन दुचाकीस्वारांमध्ये वाद सुरू होते. त्या वेळी एका दुचाकीस्वाराच्या बाजूने आरोपी निहालसिंग आणि राहुलसिंग भोंड भांडण करत होते. आरोपींच्या हातात कोयता होता.
त्यावेळी तेथून निघालेले सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांनी आरोपींना भांडण करताना पाहिले. त्यावेळी गायकवाड यांनी भांडणात मध्यस्थी करून आरोपी निहालसिंग टाक याच्या हातातील कोयता काढून घेण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत टाकने कोयता फेकून मारल्याने गायकवाड यांच्या कपाळावर गंभीर जखम झाली. या घटनेनंतर टाक आणि साथीदार भोंड हे घटनास्थळावरून फरार झाले.
दरम्यान, पसार झालेल्या सराईत गुंडाना पकडण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यावरून सोलापूर ग्रामीण पोलिसांनी आरोपींना पकडून पुण्याच्या गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या ताब्यात दिले. पुढील तपास पोलीस करत आहेत.