विशाल कदम
लोणी काळभोर : “आरडा ओरडा करु नका, तुमच्या घरी निघुन जा” असे म्हणाल्याचा राग मनात धरून पोलिसाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना लोणी काळभोर (ता. हवेली) येथील टोलनाक्यावर बुधवारी (ता.१६) मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली.
विवेक किशोर साळुंखे (वय-२६. रा.साळुंखे वस्ती मांजरी खुर्द पुणे) व मयुर बबन आंबेकर ( वय २८) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकाळभोर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार आडके व संदीप धुमाळ हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते. गस्त घालत असताना पोलिसांना लोणी टोलनाका येथील जनता हॉटेलच्या समोर दोन इसम हे रस्त्याच्या कडेला मोटारसयकलवर बसुन जोरजोरात आरडाओरडा व बाचाबाची करत होते.
त्यानंतर पोलीस आमलदार संदीप धुमाळ यांनी आरोपींना “आरडा ओरडा करु नका. तुमच्या घरी निघुन जा” असे सांगितले. तेव्हा आरोपींनी धुमाळ यांचा राग मनात धरून शिवीगाळ करुन हाताने मारहान केली. तसेच जीवे मारण्याच्या ऊद्देशाने धुमाळ यांच्या डोक्यात दगड मारुन गंभीर जखमी केले. धुमाळ हे सध्या लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.
दरम्यान, लोणी काळभोर पोलिसांनी आरोपी विवेक साळुंखे व मयुर आंबेकर याला अटक केली आहे. त्यांच्यावर लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा व जीवे मारण्याचा प्रयत्न अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे करीत आहेत.