शिक्रापूर : कान्हूर मेसाई येथील अंकुश खर्डे वय (60) या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. या हल्ल्यात त्यांच्या तोंडाला हाताला जखमा झाल्या आहेत. त्यांच्यावर शिरूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना (ता. 26) रोजी सकाळी सहा वाजता कान्हूर मेसाई (ता. शिरूर ) येथील ढगेवाडी वस्तीवर घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, ढगेवाडी वस्तीवर अंकुश खर्डे हे आपल्या कुटुंबासमवेत राहतात. ते नेहमी प्रमाणे सोमवार (ता.26) रोजी सकाळी चालायला गेले. त्याच रस्त्यावर त्यांची विहीर असल्याने पिण्याची पाण्याची मोटार चालू करायला गेले असता. सकाळी सहा वाजता दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक अंकुश खर्डे यांच्यावर हल्ला केला, तरी देखील प्रसंगावधान राखून खर्डे यांनी जोरदार प्रतिकार केला व आरडा ओरड केल्यानंतर बिबट्याने तेथून धूम ठोकली. या हल्ल्यात खर्डे हे जखमी झाले असून त्यांच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या आहेत. जखमी झालेल्या खर्डे यांना तातडीने सॊमवारी सकाळी शिरूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
शेतकऱ्यावर झालेल्या बिबट्याच्या हल्ल्याची माहिती तातडीने पुणे जिल्हा राष्ट्रवादी सरचिटणीस बबन शिंदे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळवली. त्याठिकाणी वन विभागाचे अधिकारी गणेश पवार, हनुमंत कारकूड हे तातडीने हजर झाले व यांनी वनविभागाकडून उपचारासाठी लस उपलब्ध करून दिली. या परिसरात मागील महिन्यात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. परंतु वन विभागाने पिंजरा लावल्यानंतर बिबट्या जेरबंद झाला होता. त्यानंतर पुन्हा ही घटना घडल्याने शेतकरी वर्गात दहशत पसरली आहे .