नवी दिल्ली : उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहाचा विस्तार वाढताना दिसत आहे. त्यात आता अदानी समूहाची कंपनी अदानी पॉवरला ‘लॅन्को अमरकंटक पॉवर लिमिटेड’ या कंपनीच्या अधिग्रहणास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता अदानी पॉवरचा ही कंपनी खरेदी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातील पाथाडी गावात असलेल्या या कंपनीच्या खरेदी करारास हैदराबाद खंडपीठाने मान्यता दिली आहे. अदानी पॉवर कंपनी आणि लॅन्को अमरकंटक पॉवर लिमिटेड यांच्यातील हा करार तब्बल 4,101 कोटी रुपयांचा असणार आहे. अदानी पॉवर ही कंपनी रोख पेमेंटच्या बदल्यात लॅन्को अमरकंटकमधील 100 टक्के हिस्सा खरेदी करणार आहे.
दरम्यान, हा करार पूर्ण झाल्यानंतर अदानी पॉवरकडे लॅन्को अमरकंटक कंपनीचे पूर्ण अधिकार असणार आहेत. ही कंपनी छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातील पाथडी गावात 600 मेगावॅटचा औष्णिक ऊर्जा प्रकल्प चालवते. त्यामुळे आता हा प्रकल्प लवकरच अदानी समूहाकडे येणार आहे.
अदानी पॉवरचे शेअर्स तेजीत
अदानी समूह लॅन्को अमरकंटक पॉवर लिमिटेड कंपनी खरेदी करणार असल्याची घडामोड घडत असतानाच अदानी पॉवरचे शेअर्स तेजीत असल्याचे पाहिला मिळाले.