पुणे : स्ववापराच्या निवासी मिळकतींना मिळकत करात ४० टक्के सवलतीच्या अनुषंगाने पुणे महापालिकेच्या मिळकत कर विभागाने सर्वेक्षण अभियान राबविले. त्यात २ लाख १६ हजार मिळकती भाडेकरू वापरत असल्याचे समोर आले आहे. पुणे महापालिका कार्यक्षेत्रातील स्ववापराच्या निवासी मिळकतीस ४० टक्के सवलतीच्या अनुषंगाने वडगाव धायरी, वडगाव बुद्रुक व हिंगणे या भागात प्रायोगिक तत्त्वावर भेट देऊन तपासणी सुरू करण्यात आली.
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून १५ ऑगस्ट या कालावधीत पीटी ३ फॉर्म नागरिकांकडून भरून घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणाकरिता पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून ७५ अतिक्रमण निरीक्षक तसेच विधि विभागांकडून ७५ लिपिक टंकलेखक अशा एकूण १५० इतक्या सेवकांची नियुक्ती करण्यात आली होती. याशिवाय खात्याकडील सर्व विभागीय निरीक्षक व पेठ निरीक्षक यांच्याकडूनदेखील घरोघरी अर्जाचे वाटप करण्यात आले होते.