प्रदिप रासकर
निमगाव भोगी : अण्णापूर (ता. शिरूर) हे गाव बिबट प्रवण क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. तसेच बिबट प्रवण क्षेत्र घोषित केलेल्या इतर गावामध्ये महावितरण मार्फत वीज जोडणीचे काम पूर्ण झाले आहे. दरम्यान, गावातील शेतकऱ्यांना दिवसा शेतीपंपासाठी ३ फेज लाईट व पूर्णवेळ सिंगल फेज लाईट मिळावी यासाठी केशव शिंदे हे महावितरण कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.
वारंवार अण्णापुर व शिरूर तालुक्यात बिबट्याचा लोकवस्तीत मुक्त संचार असल्याने दिवसेंदिवस बिबट्याचे पाळीव पाण्यावर होणारे हल्ले सुरूच आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जीवितहानी होऊ नये म्हणून दिवसा 3 फेज व पूर्णवेळ सिंगल फेज लाईट कनेक्शन जोडण्यात यावे. यासाठी अण्णापूर ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांमार्फत वेळोवेळी पत्रव्यवहार व दुरध्वनी मार्फत संपर्क करण्यात आला आहे. प्रत्येक वेळी उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत असल्याने केशव शिंदे यांनी उपोषणाचे अवजार उपसले आहे.
यावेळी शिरूर तालुक्याचे आमदार अशोक पवार यांनी उपोषण स्थळाला तात्काळ भेट दिली आहे. यावेळी आमदार पवार यांनी महावितरणचे कर्मचारी जाधव यांना संपर्क करून दिवसा थ्री फेज लाईट चालू करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर महावितरणनेही तत्काळ दिवसा थ्री फेज लाईट सुरु केली. यानंतर आमदार अशोक पवार यांच्या हस्ते उपोषण मागे घेण्यात आले. आमदार अशोक बापू पवार यांनी बिबट प्रवण क्षेत्रांत जशी थ्री फेज लाईट शेतकऱ्यांना दिली गेली, तसेच राज्यातील इतर शेतकऱ्यांनाही दिवसा थ्री फेज लाईट होईल यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिली.