विजय लोखंडे
वाघोली : “ओव्हरलोड डंपर वाहतुकीमुळे वाघेश्वर मंदिर ते भावडी रस्त्याची चाळण” आणि “भावडी रोड कृती समितीच्या वतीने शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तथा वाघोलीचे माजी उपसरपंच संजय सातव पाटील यांचा आंदोलनाचा इशारा” अशा आशयाची बातमी रविवारी १८ ऑगस्ट रोजीच्या दैनिक पुणे प्राईम न्युज वृत्तपत्र अंकात प्रसिद्ध झाली होती.
या बातमीची दखल घेत वाघोली-भावडी रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरु झाले आहे. या रस्त्याच्या कामासाठी पुणे मनपाकडून २ कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा पुणे जिल्हा खाण क्रशर उद्योग संघाचे कार्याध्यक्ष रामभाऊ दाभाडे यांनी दिली आहे. क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे वाघोली-भावडी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. हे खड्डे पुणे जिल्हा खाण क्रशर संघटनेच्या वतीने सिमेंट काँक्रीटीकरण टाकून बुजविण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
गेली अनेक वर्षांपासून दयनीय अवस्था झालेल्या वाघोली-भावडी रस्त्यासाठी माजी आमदार स्व.बाबुराव पाचर्णे यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. यासाठी वाघोलीतील लोकप्रतिनिधी व संघटनांनी पाठपुरावा केला होता. आठ कोटी रुपये खर्च करून वाघोली-भावडी रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्यात आले होते. परंतु या परिसरात दगड खाण पट्टा असल्याने क्षमतेपेक्षा अधिक मालाची वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांमुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी पडलेल्या खड्यांमुळे रस्त्याची दुरावस्था झाली. तात्काळ रस्ता दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली होती.
वाघोली-भावडी रस्त्यावर पडलेले खड्डे संघटनेच्या माध्यमातून सिमेंट काँक्रीटीकरण टाकून बुजवण्यात येत आहेत. पुणे महापालिकेच्या वतीने दोन कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच रस्त्याचे काम सुरु होईल.
– रामभाऊ दाभाडे (कार्यध्यक्ष, पुणे जिल्हा खाण क्रशर उद्योग संघ)