यवतमाळ : राज्यातील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. या घटनांमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधक सत्ताधारी पक्षांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्व घडामोडीवर अजित पवार यांनी एक संतापजनक वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले, अशा प्रकारची विकृत माणसं जेव्हा आमच्या आया-बहिणींवर हात टाकतात, त्यावेळी त्यांना कायद्याचा बडगा दाखवलाच पाहिजे. माझ्या भाषेत सांगायचं झालं तर, अशा विकृतांचे सामानच काढून टाकलं पाहिजे, असं संतापजनक वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. अजित पवार यवतमाळमध्ये बोलत होते.
काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार म्हणाले, काही नराधम आणि विकृत माणसं काही गोष्टी करतात. याला लाडकी बहीण योजनेला जोडण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत. माझी विरोधकांना पण विनंती आहे. वेगवेगळ्या घटना अनेकांच्या काळात घडल्या आहेत. मी कोणत्याही घटनेचं समर्थन करणारा नाही. जो चुकीचं वागेल त्याला शासन झालंच पाहिजे. तो कितीही मोठ्या बापाचा असू द्या. त्याची फिकीर आम्ही करणार नाही. त्याला आम्ही कडक शासन करणार असल्याचे अजित पवार म्हणाले.
पुढे बोलताना म्हणाले, आमचा शक्ती कायद्यासाठी प्रयत्न सुरु आहे, राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी गेला आहे. अशा प्रकारची विकृत माणसं जेव्हा आमच्या आया-बहिणींवर हात टाकतात, त्यावेळी त्यांना कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे. माझ्या भाषेत सांगायचं झालं तर, अशा विकृतांचे सामानच काढलं पाहिजे. तसेच शहरी भाग, ग्रामीण भाग, विदर्भ, मराठवाडा , उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र कोठेच कायदा व सुव्यवस्था अडचणीत येता कामा नये. यासाठी कडक कारवाई केले जातात, असंही अजित पवारांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.