दौंड : दौंड तालुक्यातील पिंपळगांव ते टोलनाका या 15 किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करत जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. संबंधित विभागाने वेळीच लक्ष घालून रस्त्याच्या कामाला सुरूवात करावी, असे मत विद्यार्थी आणि ग्रामस्थांतून व्यक्त केले जात आहे.
अनेक गावांना जोडणाऱ्या या मार्गावरील नागरीकांना उद्योग, व्यवसाय, शाळा, नोकरी, रुग्णालय महाविद्यालयीन शिक्षणासाठी खुटबाव, केडगाव, वरवंड , चौफुला अशा गावामध्ये यावे लागते. अशा या खड्डेमय झालेल्या रस्त्यावरून जीव मुठीत घेत जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने सातत्याने अपघात होत आहेत. पिंपळगांव ते टोलनाका अशा 10 ते 12 किलोमीटरच्या अंतरावरती खड्डे पडल्यामुळे वाहन चालवत असताना चालकांना कसरत करावी लागत आहे. रस्ता वर्दळीचा असून रस्त्याने अनेकजण प्रवास करतात.