पुणे : राज्यात पावसाचा जोर वाढू लागला आहे. अरबी समुद्रात आणि पश्चिम बंगालमध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे. मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांत पावसाने धुमाकूळ घातला आहे. येणाऱ्या 3-4 दिवस पावसाची अशीच स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यापार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा..
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज (ता. 24) कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात असून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात देखील पावसाचा जोर वाढणार असल्यामुळे यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरात सुद्धा आज पावसाचे पुनरागम होणार आहे. मुंबई, ठाणे, रायगड, नवी मुंबई, कल्याण, पालघरमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईकरांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट..
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दुसरीकडे नाशिक, जळगाव, नंदुरबार, या जिल्ह्यातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.