राजगुरुनगर, (पुणे) : शिक्षक पतीने पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून करून आत्महत्या केल्याचा बनाव रचल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पडाळवाडी परिसरात १९ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे. सीमा आदिनाथ कुटे (वय-३५, रा. पडाळवाडी, राजगुरुनगर, ता. खेड) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. खेड पोलिसांनी आरोपी शिक्षक पतीवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
या प्रकरणी तिचा पती आदिनाथ सुखदेव कुटे (वय-४०, रा. पडाळवाडी , राजगुरुनगर, ता. खेड) खेड पोलिसांनी याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा पती सुखदेव याला दारूचे व्यसन होते. घटनेच्या दिवशी तो सकाळीच दारू प्यायला बाहेर गेला होता. तो घरी परत आल्यानंतर सीमा हिने ‘कुठे गेला होता?’ असे विचारले असता, त्यावरून दोघांत भांडण झाले होते. दरम्यान, या दोघांच्या वादातून नशेत असलेल्या आदिनाथने सीमा हिचा ओढणीने गळा आवळून खून केला आहे. त्यानंतर बेडरुमच्या दरवाजाची आतील कडी त्याने चतुराईने बंद केली.
आरोपीने त्याच्या मित्रांना आणि नातेवाईकांना फोन करून पत्नी सीमा दरवाजा उघडत नाही, तुम्ही लवकर या असा बनाव केला. तेथील स्थानिक नागरिकांनी दरवाजा तोडून सीमाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांनी सुखदेवला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली त्यांना दिली आहे.