रामटेक (नागपूर): दारूचे अतिसेवन करून वाहन चालविणे, या क्षणाचा आनंद लुटणे, एखाद्याच्या सुखी कुटुंबातील आनंदाला दृष्ट लावते. असे प्रकार अनेकांसाठी काळ ठरते. अशीच हृदयाचा थरकाप उडविणारी घटना रामटेक मौदा मार्गावर घडली. भरधाव कारने दुचाकीला धडक दिली. दारूचे सेवन करून वाहन चालविण्यात चालक व मित्रांची मौज झाली खरी, परंतु या अपघातात एक दिवसापूर्वी जन्मलेले नवजात बाळ वडिलांच्या प्रेमाला कायमचे मुकले. यात काकू व पुतण्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतक युवकाला मंगळवारीच मुलगा झाला होता. ही घटना रामटेक ते मौदा मागांवरील रेनबो हॉटेलसमोर बुधवारी (२१ ऑगस्ट) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास घडली. सचिन ठाकरे (३०) व विजया भीमराव ठाकरे (५०), दोघेही रा. हमालपुरी, रामटेक) अशी मृतक काकू-पुतण्याची नावे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतक पुतण्या सचिन व त्याची काकू विजया या एमएच ३६/एएम ११५७ मोपेड दुचाकीने खासगी रुग्णालयातून घरी परतत होते. दरम्यान, स्विफ्ट डिझायर कार क्रमांक सीजी ०४/एनएच ६५१५ चा चालक शंकर किशोर जसवानी (२३), पंकज मोतीराम नागवानी (३९, दोघेही रा. रायपूर) व अजिज शेख (३०, रा. ताजबाग, नागपूर) हे रामटेकमार्गे मौद्यावरून रायपूरच्या दिशेने जात होते. दरम्यान, हॉटेल रेनबोसमोर कारचालकाने दुचाकीला जोरदार धडक दिली. दुचाकीवरील काकू व पुतण्या घटनास्थळापासून ३० फूट अंतरापर्यंत फरफटत गेले. यामध्ये पुतण्या व काकू गंभीर जखमी झाली. तातडीने रामटेक उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून दोघांनाही मृत घोषित केले. भरधाव कारचा चालक आणि त्याच्या इतर दोन मित्रांनी अतिदारूचे सेवन केल्याचे सांगण्यात येते. रामटेक पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे. भारतीय न्यायसंहितेच्या कलम २८१ व इतर कलमांन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. मृतदेहांचे शवविच्छेदन रामटेक उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले. पुढील तपास रामटेक पोलीस करीत आहे.
घरातील आनंद दुःखात बदलला
मृतक सचिन मुलचंद ठाकरेला एक दिवसापूर्वी अर्थात २० ऑगस्टला मुलगा झाला. त्यामुळे संपूर्ण कुटुंब आनंदात होते. हॉस्पिटलमध्ये टिफिन देऊन सचिन व त्याची काकू घरी परतत असताना त्यांना काळाने गाठले. घरातील आनंद अचानक दुःखात बदलला. या अपघातामुळे दुसऱ्याच दिवशी नवजात मुलाने वडील गमावल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.