दौंड: राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर अत्याचाराच्या घटना घडत आहेत, त्यामुळे राज्यात संतापाची एकच लाट उसळली आहे. बदलापूर, अकोला, पुणे, येथील घटनेनंतर आता दौंड तालुक्यातील मळद गावात शालेय विद्यार्थिनींचे शिक्षकाकडून लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
दौंड तालुक्यातील मळदमधील भैरवनाथ माध्यमिक विद्यालयात एका शिक्षकाकडून सातवी,आठवी आणि नववीमध्ये शिकत असणाऱ्या आठ ते नऊ विद्यार्थिनींना ब्लॅकमेल करून अत्याचार केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी विद्यालयात येऊन गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे.
शाळेतील इंग्रजी विषयाचा शिक्षक बापूराव धुमाळ याने व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल आणि इतर साधनांचा वापर करत अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल आणि अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार पालकांना समजल्यानंतर शाळेमध्ये जाऊन संतप्त पालकांनी शाळा प्रशासनाला जाब विचारला. याप्रकरणी पुणे ग्रामीण अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे चौकशी करीत असून संबंधित शिक्षकाचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे . पोलिसांकडून विद्यालयात चौकशी सुरू आहे.