नवी दिल्ली: गेल्या वर्षी देशभरातील ६५ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी इयत्ता १० वी आणि १२ वी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. विविध राज्य मंडळांमध्ये अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण केंद्रीय मंडळांच्या तुलनेत जास्त असल्याची माहिती शिक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
देशातील ५६ राज्य मंडळे, बोर्ड आणि ३ राष्ट्रीय मंडळांसह ५९ शाळा मंडळांच्या इयत्ता १० वी आणि १२ वीच्या निकालांच्या विश्लेषणातून सरकारी शाळांमधून जास्त मुली बारावीच्या परीक्षेला बसल्या होत्या; परंतु खाजगी शाळा आणि सरकारी अनुदानित शाळांमध्ये परिस्थिती उलट असल्याचे दिसून आले आहे. दहावीतील सुमारे ३३.५ लाख विद्यार्थी पुढील वर्गात जाऊ शकले नाहीत. यामध्ये ५.५ लाख विद्यार्थी परीक्षेला बसले नाहीत, तर २८ लाख अनुत्तीर्ण झाले.
त्याचप्रमाणे बारावीचे सुमारे ३२.४ लाख विद्यार्थी उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. यामध्ये ५.२ लाख विद्यार्थी परीक्षेला बसले नाहीत, तर २७.२ लाख विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. इयत्ता दहावीमध्ये केंद्रीय बोर्डात विद्यार्थ्यांचे अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण ६ टक्के होते, तर राज्य बोर्डात हे प्रमाण १६ टक्के होते. इयत्ता बारावीमध्ये केंद्रीय बोर्डांमध्ये अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण १२ टक्के आहे, तर राज्य बोर्डामध्ये १८ टक्के आहे, असे शिक्षण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन्ही वर्गामध्ये मुक्त विद्यालयाची कामगिरी खराब होती. इयत्ता दहावीत जास्त नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या मध्य प्रदेशातील असून, त्यापाठोपाठ बिहार आणि उत्तर प्रदेशचा क्रमांक लागतो. बारावीत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची सर्वाधिक संख्या उत्तर प्रदेशातील असून, त्यापाठोपाठ मध्य प्रदेशचा क्रमांक लागतो, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.