पुणे : राज्यात काही दिवसांपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. सध्या पावसाने थोडी उसंत घेतल्याचे दिसून येत आहे. सध्या ढगाळ हवामान असल्यामुळे उकाड्यामध्ये देखील वाढ झाली आहे.
पुणे, सातारा, सांगली, आणि अहमदनगर येथे आज हलक्या पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. याव्यतिरिक्त विदर्भ, रायगड आणि अहमदनगरच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. अमरावती, वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा आणि गोंदियासह विदर्भातील भागातही आज पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.
भारतीय हवामान विभागाने ऑगस्टमध्ये पावसाचा जोर कमी होईल, असा अंदाज वर्तवला होता. तो आता खरा ठरताना दिसत आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळं आता सप्टेंबर महिन्यात तरी पावसाचा जोर कामय असेल अशी शक्यता आहे.
हवामान विभागाने मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी शनिवार-रविवार पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र, आज गुरुवारी मुंबईत आणि राज्यातही फारसा पाऊस होण्याची शक्यता नाहीये. गुरुवारी पालघर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याकाळात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस कोसळू शकतो. घाटमाथ्यावरही आज पाऊस होऊ शकतो. पुणे, रायगड या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे.