जिंती : अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या आरक्षणामध्ये उपवर्गीकरण आणि क्रिमिलेअर लावण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात आज बुधवारी (ता. 21, ऑगस्ट) भारत बंदचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला जिंती (ता. करमाळा) येथील व्यापाऱ्यांसह नागरिकांनी कडकडीत बंद ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
जिंती येथील आठवडे बाजार, धान्य व किराणा दुकाने, बाजार पेठ, छोट्या मोठ्या टपऱ्या बंद केल्या होत्या. या बंदच्या कालावधीत केवळ दवाखाने, मेडिकलसह अत्यावश्यक सुविधा सुरु होत्या. या बंदचे आवाहन जिंती येथील सिद्धार्थ तरुण मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.
मंडळाच्या वतीने संदीप जगताप, रवींद्र धेंडे, विनोद चव्हाण, जितेश धेंडे यांनी करमाळा पोलीस ठाण्यात निवेदनही देण्यात आले होते. तर या बंदसाठी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) जिल्हा उपाध्यक्ष नितीन राजेभोसले यांचे बहुमूल्य सहकार्य मिळाले.
दरम्यान, आरक्षण उपवर्गीकरणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा १ तारखेला निर्णय येताच याविरोधात देशभरात असंतोष पसरला होता. त्यानुसार काही सामाजिक संघटनांनी भारत बंदचे आवाहन केले होते. या आवाहनाला जिंती ग्रामस्थांनी कडकडीत बंद ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.