केडगाव : दौंड तालुक्यात दोन दिवसापासून होणारा कमी पाऊस, पण वारे जास्त यामुळे अनेक भागांतील ऊस पिकाच मोठं नुकसान झाले आहे. वाऱ्यामुळे उसाचे फड भुईसपाट झाले आहे. मागच्या चार दिवसांपासून वातावरणात कमालीची उष्णता वाढली आहे. त्यातच पाऊस कमी, पण वारे जास्त यामुळे उभ्या उसाचे मोठे नुकसान झाले आहे. मागच्या दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील खुटबाव, देलवडी, नाथचीवाडी, एकेरीवाडी, पिंपळगांव, राहु, पारगाव आदी भागाला वाऱ्याचा जोरदार फटका बसला.
रात्रीच्या वेळी सातत्याने वारे वाहू लागल्याने 10-12 कांड्यावर आलेला उंच ऊस आडवा झाला आहे. आडवा झालेला ऊस सरळ करणे कठीण असल्याचे शेतकरी सांगत आहेत. जोरदार पाऊस झाल्यास आडवा झालेला ऊस कुजून उंदरे लागण्याची भीती आहे. ऊस लोळल्याने त्याला कोंब फुटण्याची भीती व्यक्त होत आहे. लोळलेल्या उसाला साखर कारखान्याचे ऊसतोड मजूर तोडणीसाठी शेतकऱ्यांनी पिळवणूक करतील, अशीही भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. अशा नैसर्गिक तडाख्याने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. वाऱ्यामुळे हक्काचे ऊस पीक भुईसपाट झाले. यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत.
त्यातच कमालीची उष्णता देखील वाढत असल्याने हूमणी या किटकामुळे उसाचे बेंदाडे मुळापासून उकरले जात आहे. पीकवाढीला अटकाव करणारी आणि शेतातील मूलद्रव्ये खाऊन झालेली हुमणी अधिक नुकसानकारक होत आहे. जमिनीतील वास्तव्यामुळे लवकर लक्षात देखील येत नाही तर कीटकनाशकांचा त्यावर फारसा परिणाम होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. हाता तोंडाशी आलेले पीक डोळ्यादेखत वाया जात आहे.
हुमणी कीड नियंत्रणासाठी कृषी विभागामार्फत हुमणी कीड व्यवस्थापन मोहीम कृषी सहायकांच्या मार्फत गावोगावी राबविण्यात येत आहे. या मोहिमेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. शेतकऱ्यांनी सहभाग घेतला तर कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्यासाठी देखील मार्गदर्शन लाभेल. त्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अनेक कार्यशाळांमध्ये सहभागी होत जावे.
-अजित फराटे, कृषी अधिकारीसध्याचा कमी पाऊस व हुमणी या किटकांच्या उपद्रवामुळे उसाचे फड भुईसपाट झाले आहेत. अती उष्णतेमुळे या किटकाचे जास्त खोलवर वास्तव्य जाऊ लागले आहे. त्यामुळे त्याठिकाणी हा किटक मुळे नष्ट करत आहेत. हलका वारा जरी आला तरी देखील पीक मुळे नष्ट झाल्याने भुईसपाट होत आहे.
–संजय वांझरे, शेतकरी