कोल्हापूर: कोगे (ता. करवीर) येथील वेफर्स व फरसाणा उत्पादकाच्या कारखान्यातून घेतलेले तेल, बेसन व मिरची पावडरचे नमुने न तपासता कारवाई टाळण्यासाठी ४५ हजारांची लाच स्वीकारताना अन्न सुरक्षा अधिकारी एसीबीच्या जाळ्यात अडकला. सुभाष रोडवरील सहायक आयुक्त अन्न औषध प्रशासन कार्यालयात मंगळवारी सायंकाळी कारवाई करण्यात आली.
विकास रोहिदास सोनवणे (वय ५०, रा. प्रतिभानगर) असे अटक केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदार यांचा कोगे येथे वेफर्स व फरसाणा तयार करण्याचा कारखाना आहे. ५ ऑगस्ट रोजी अन्न सुरक्षा अधिकारी विकास सोनवणे याने कारखान्यात तपासणी करून तेल, बेसन, मिरची पावडरचे नमुने घेतले होते. त्यानंतर त्यांनी कारखान्याच्या मालकांना रोडवरील आपल्या कार्यालयात बोलवून घेतले. कारखान्यातून घेतलेले नमुने तपासणी करत नाही, तसेच कोणत्याही प्रकारची कारवाई करत नाही; मात्र यासाठी ८५ हजार रुपये द्यावे लागतील, सांगितले. तडजोडीने हा व्यवहार ४५ हजार रुपयांना ठरला.
याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक बापू साळुंखे यांची भेट घेऊन तक्रार दाखल केली होती. त्यानुसार सरकारी पंचांना सोबत घेऊन एसीबीच्या पथकाने अन्न व औषध प्रशासन कार्यालयात जाऊन खात्री केली. तेव्हा अन्न सुरक्षा अधिकारी विकास सोनवणे हा ४५ हजार रुपयांची लाच मागत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मंगळवारी ४५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने सोनवणे यास अटक केली.