पुणे : पुण्यातील खडकी रेल्वे स्थानक परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. आर्थिक वादातून तरुणाने धावत्या रेल्वेगाडी खाली उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ऋषीकेश जयदेव म्हसारे (वय-२७, रा. इनामदारनगर, कोंढवा बुद्रुक) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पाचजणांविरुद्ध बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आनंद दंडनाईक, बालाजी बहिरवाल, गणेश बिबिनवरे, प्रशांत कदम, विकास कसबे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत ऋषीकेशचे वडील जयदेव रामदास म्हसारे (वय-५८) यांनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषीकेशने ओैषधनिर्माण शास्त्र अभ्यासक्रम केला होता. तो एका ओैषध विक्री दुकानात काम करत होता. आरोपी दंडनाईक, बहिरवाल, बिबिनवरे, कदम, कसबे हे देखील ओैषध विक्री दुकानात कामाला होते. ऋषीकेशने त्यांच्याकडून हातउसने पैसे घेतले होते. दरमहा त्यांना तो पैसे परत करत होता. तरीही आरोपींनी त्याला त्रास देण्यास सुरुवात केल्याने तो नैराश्यात होता,
आरोपींच्या त्रासामुळे तो १ जून रोजी घरातून पसार झाला होता. ऋषीकेशच्या वडिलांनी तो बेपत्ता झाल्याची तक्रार बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर ऋषीकेशने खडकी रेल्वे स्थानक परिसरात धावत्या रेल्वेगाडी खाली उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी त्याने वडिलांच्या मोबाइलवर संदेश पाठविला होता. आरोपींच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत असल्याचे त्याने संदेशात म्हटले होते. वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.