मुंबई: महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ येत्या २५ ऑगस्ट रोजी घेण्यात येत असून, सद्यस्थितीत या परीक्षेशी संबंधित सर्व पूर्वतयारी झालेली आहे. त्यामुळे या परीक्षेमध्ये कृषी सेवेतील पदांचा समावेश करणे शक्य नसल्याने महाराष्ट्र कृषी सेवेतील प्राप्त मागणी पत्रातील पदांच्या भरती प्रक्रियेबाबत पुढील नियोजन लवकरच करण्यात येईल, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेबरोबर कृषी सेवेतील २५८ पदांची भरती प्रक्रिया राबवावी, या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्याव्यांनी विविध माध्यमांतून प्रयत्न सुरू केले होते. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन कृषी सेवा गट अ व गट ब संवर्गातील पदांची भरती प्रक्रिया संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये समाविष्ट करून घेण्यात यावी, अशी विनंती केली होती.
कृषी सेवा गट-अ व गट-ब संवर्गातील एकूण २५८ पदांचे मागणीपत्र आयोगास १६ ऑगस्ट २०२४ रोजी शासनाकडून प्राप्त झाले आहे. एमपीएससीच्या २९ डिसेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध केलेल्या परीक्षा योजनेनुसार कृषी सेवेतील पदे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त परीक्षेतून भरण्यात येणार असल्याचे नमूद केलेले आहे. परंतु, या परीक्षेसंदर्भात २९ डिसेंबर २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध होईपर्यंत आयोगाकडे कृषी सेवा परीक्षा २०२४ साठी मागणीपत्र शासनाकडून प्राप्त झाले नसल्याने कृषी सेवेतील पदांचा समावेश या जाहिरातीमध्ये करणे शक्य झाले नाही. त्यामुळे कृषी सेवेतील प्राप्त मागणीपत्रातील पदांच्या भरती प्रक्रियेबाबत पुढील नियोजन लवकरात लवकर करण्यात येईल, असे आयोगाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात नमूद केले आहे.