मुंबई: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून लाभार्थ्यांच्या खात्यात पाठवलेले पैसे थकीत कर्जाच्या बदल्यात कापण्यात येऊ नयेत, लाभार्थी महिलांना थकबाकी असल्याने रक्कम काढण्यास नकार देऊ नये, बँकेत यापूर्वीच्या कर्जाची रक्कम परतफेड न केल्याने बँक खाते गोठवले असल्यास ते खाते तातडीने सुरू करावे आणि या योजनेची रक्कम द्यावी, असे आदेश महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव यांनी राज्यस्तरीय बँकर्स समितीचे समन्वयक, मुंबई वगळून राज्यातील सर्व जिल्हा बँकांना दिले आहेत.
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेचा जुलै, ऑगस्ट या दोन महिन्यांचा तीन हजार रुपये एवढा आर्थिक लाभ पात्र लाभार्थी महिलांना त्यांच्या आधारजोडणी केलेल्या बँक खात्यात थेट जमा झाला आहे. मात्र, या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांना प्राप्त झालेला आर्थिक लाभ देण्यात येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. यादव यांनी हे आदेश दिले.
या योजनेतून हस्तांतरित केलेली रक्कम कोणत्याही थकीत कर्जाच्या बदल्यात समायोजित केली जाऊ नये. ही रक्कम विशिष्ट उद्देशासाठी असून, ती इतर कर्ज समायोजनासाठी वापरता येणार नाही. योजनेच्या लाभाची रक्कम संबंधितांच्या खात्यात जमा केल्यानंतर लाभार्थी महिलांना कोणत्याही थकबाकीच्या समायोजनामुळे रक्कम काढण्यास नकार देण्यात येऊ नये., असे आदेशात नमूद केले आहे. या आदेशाची प्रत राज्याच्या मुख्य सचिव, सहकार आयुक्त यांना पाठवण्यात आली आहे.