पुणे : आषाढी पौर्णिमा म्हणजेच वर्षावासाचा प्रारंभ या मंगल प्रसंगाचे औचित्य साधून बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 578 अण्णाभाऊ साठे गृहनिर्माण हाउसिंग सोसायटी येथे जेतवन बुद्धविहारात श्रीधर मोरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच बौद्धजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांच्याहस्ते बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.
या प्रसंगी कालिदास कोळंबकर, बौद्धजन पंचायत समितीचे चिटणीस संदेश खैरे , गटक्रमांक १३ शिवडी विभागाचे गटप्रमुख रामदास गमरे , भाई जोशी, विभागाचे प्रतिनिधी समाजसेवक आणि रिपब्लिकन सेना दक्षिण मुंबई अध्यक्ष भगवान साळवी, दत्ताराम गुरव, शांतिदूत संतोष जाधव आदी मान्यवरांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लावून मार्गदर्शन केले,
यावेळी प्रमुख अतिथी लक्ष्मण भगत आपल्या भाषणात म्हणाले ” याच दिनी सारनाथ येथे तथागतानी धम्मचक्र प्रवर्तन करून पाच भिक्खूना धम्मदीक्षा व धम्मोपदेश देऊन भिक्खू संघाची स्थापना केली. वर्षा म्हणजे पाऊस व वास म्हणजे वास्तव्य म्हणजेच पावसाळ्यात एकाच ठिकाणी वास्तव्य करून धम्म प्रचार प्रसाराचे कार्य करण्याचा आदेश दिला आणि हाच योग साधून आज बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना केली आहे.
दरम्यान शाखेच्या वतीने शाखाध्यक्ष श्रीधर मोरे यांच्या हस्ते सर्व पाहुण्यांसह महिला मंडळ, तरुण मंडळ व सर्वांना सन्मानित करण्यात आले. तसेच कार्यक्रमासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार मानण्यात आले.