मुंबई : बदलापूर येथे दोन लहान मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर जनतेचा उद्रेक समोर आला आहे. या घटनेवरुन पालकांसह नागरिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. नागरिकांकडून बदलापूर स्टेशनवर मंगळवारी रेलरोको आंदोलन करण्यात आले. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे. असे असताना यातील आरोपी अक्षय शिंदे याला 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
बदलापूर येथील एका शाळेत दोन चिमुकल्या विद्यार्थींनीवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. सकाळपासून नागरिकांनी शाळेबाहेर आंदोलन सुरू केले. शेकडो नागरिकांनी उपनगरिय रेल्वेची वाहतूकही रोखून धरली होती. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक सेवा गेल्या दोन तासांपासून ठप्प झाली होती. संपूर्ण बदलापुरात संतापाचे वातावरण आहे.
सरकारी वकील अश्विनी भामरे पाटील यांनी पीडितेची बाजू मांडली. विशेष महिला न्यायाधीश व्ही.ए.पत्रावळे यांच्या कोर्टात अक्षय शिंदे याला हजर करण्यात आलं.