नागपूर : खरं तर जुगार बंद करणे ही जबाबदारी पोलिसांवर आहे. परंतु पोलिसच जुगार खेळायला लागले तर? असाच एक प्रकार सद्या प्रचंड चर्चेत आहे. ऑन ड्युटीवर असलेले पोलीस कर्मचारी चक्क कार्यालयातच जुगार खेळत असल्याचा धक्कादायक व्हिडिओ सद्या व्हायरल होत आहे. कायद्याचं रक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, तेच कायद्याला पायदळी तुडवत असल्याचं चित्र या घटनेवरून दिसून येत आहे. नागपूरच्या कळमना पोलीस चौकीमध्ये हा प्रकार घडला आहे. राज्याच्या गृहमंत्र्याच्या भागातच हा प्रकार घडला असून एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर पोलीस दलातील कळमना पोलीस चौकीमध्ये ऑन ड्युटी असलेले पोलीस जुगार खेळताना व्हिडीओमध्ये दिसत आहेत. इतकंच नाही तर हे पोलीस कर्मचारी धूम्रपान करताना देखील करत आहेत. हा संपूर्ण प्रकार व्हिडिओ मध्ये कैद होऊन तो व्हिडिओ समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. शहरातील गुन्हेगारी कारवायांबाबत आधीच नागपूर पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. त्यातच आता पोलिसांचा पत्ते खेळण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे पोलीस विभागाची प्रतिमा अजूनच मलिन झाली आहे. त्यावर नागरिकांच्या प्रतिक्रिया अनेक येत आहेत.
व्हिडीओमध्ये नेमकं काय..?
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये काही पोलीस चौकीतच जुगाराचा डाव मांडला आहे. वर्दीमध्ये असलेले पोलीस जुगार खेळत असून ते यावेळी धुम्रपान करताना देखील दिसत आहेत. पोलीस चौकीत हे कर्मचारी उघडरित्या जुगार खेळत असताना त्या ठिकाणी गेलेल्या एका तक्रारदाराने हा व्हिडीओ चित्रित केल्याची माहिती मिळत आहे. या व्हिडिओनंतर नागपूर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.