नागपूर : लंडनमध्ये राहणाऱ्या मावशीने तिचा फ्लॅट लहान बहिणीला राहायला दिला. फ्लॅट मावशीने आपल्याला दिला नाही म्हणून भाच्याने लहान मावशीला संपविण्याचा निर्णय घेतला. दोघांना तिच्या खुनाची सुपारी दिली. दोघांनी केलेल्या खुनी हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. अखेर गुन्हे शाखेच्या युनिट १ने सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या माहितीवरून आरोपी पुतण्या व त्याच्या दोन साथीदारांना अटक केली. कृणाल शंभरकर (३३, रा. बुटीबोरी), साहिल कांबळे (१९, रा. धोबीनगर) आणि महिलेचा भाचा सिद्धान्त गुल्हाटी (४६) अशी अटकेतील आरोपींची तर करिना खुराणा (५७) असे गंभीर झालेल्या महिलेचे नाव आहे.
१ ऑगस्ट रोजी करिना खुराणा दुकानातून घरी पायी जात होत्या. रस्त्यात दवा धरून बसलेल्या आरोपी कुणाल व साहिलने डोक्यावर रॉडने वार करून त्यांना गंभीर जखमी करून पळून गेले. आरोपींनी दुचाकीला बनावट नंबरप्लेट लावल्यामुळे त्यांचा शोध घेणे तारेवरची कसरत होते. याप्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. गुन्ह्याचा समांतर तपास करताना गुन्हे शाखेच्या युनिट १च्या अधिकाऱ्यांनी आरोपी आलेल्या आणि परत गेलेल्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. जखमी महिलेची मुले, सुना, नातेवाईकांना विचारपूस केली. परंतु, कोणीच कोणावर संशय व्यक्त केला नाही.
अखेर सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी आरोपींचे स्पष्ट चेहरे मिळविले. आरोपी कुणाल, साहिल आणि टीप देणारा भाचा सिद्धान्तला ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. कुठलाही सुगावा नसताना गुन्हे शाखेच्या युनिट १ने आरोपींच्या मुसक्या आवळल्या. ही कारवाई निरीक्षक सुहास चौधरी यांच्या मार्गदर्शनात सपोनि. सचिन भोंडे, योगेश वासनिक, स्वप्निल खोडके, मनोज टेकाम, नितीन वासनिक, विनोद देशमुख, हेमंत लोणारे, सुशांत सोळंकी यांनी केली