नाशिक : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. अनेक दिग्गज नेतेमंडळी आरोप प्रत्यारोप करताना दिसून येत आहेत. अशातच आता विधानसभेच्या मैदानात मुंबईच्या माजी पोलीस आयुक्तांची एन्ट्री झाली असून संजय पांडे यांनी निवडणूक लढणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. नाशिकमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.
या पक्षाद्वारे लढणार निवडणूक..
सविस्तर माहिती अशी की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत मोठी घोषणा केली आहे. आगामी विधानसभा निवडणूक राष्ट्रीय जनहित पक्षाच्या माध्यमातून लढवणार असल्याचे संजय पांडे यांनी माहिती दिली आहे. तसेच त्यांनी पक्षाच्या चार उमेदवारांचीही घोषणा केली आहे.
आम्ही सेक्युलर विचारधारेचे..
“आम्ही सेक्युलर विचारधारेचे आहोत. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये आम्ही समविचारी पक्षांबरोबर जाण्याबाबत सुद्धा चर्चा सुरू करणार आहे. राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आमचे उमेदवार उभे राहणार आहेत. त्यापैकी देवराली, विरार, मी स्वतः वर्सोवामधून उभे राहणार आहे. इतरही १० उमेदवार आम्ही उभे करणार आहोत. आमच्या पक्षाची नोंदणी झाली नाही ती आम्ही करु, शासकीय कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर वेलफेअरसाठी आमचा पक्ष काम करेल,” असे पांडे यांनी स्पष्ट केले आहे.
वर्सोवा विधानसभा मतदार संघातून प्रचाराला सुरूवात..
काही दिवसांपूर्वीच संजय पांडे यांनी वर्सोवा विधानसभा मतदार संघातून प्रचाराला सुरूवात केली आहे. अशा आशयाची फेसबूक पोस्ट त्यांनी केली होती. त्यामुळे संजय पांडे यांनी विधानसभेसाठी हा मतदार संघ निवडल्याचेही संकेत दिले होते. आता मात्र अधिकृतपणे वर्सोवामधून निवडणूक लढणार असल्याचे पांडे यांनी सांगितले आहे.