पुणे : पुण्यातील लोणीकंद परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चार महिन्यांपूर्वी लग्न झाले असताना माहेरी गेलेली पत्नी नांदायला येत नसल्याने तसेच सासरच्या मंडळीकडून सतत अपमानास्पद वागणूक दिल्याने पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घ्स्तंस घडली आहे. रियाज मोमंद मुल्ला (वय-२९, रा. एस टी कॉलनी, वाघोली) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना त्याच्या राहत्या घरी शनिवारी (दि. १७) सकाळी घडला.
याबाबत शमीन मोहमंद मुल्ला (वय-५४, रा. एस टी कॉलनी, वाघोली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी सासरे मुजीब बाबु शेख, सासू शाहीर शेख, आज्जे सासरे चाँद मौल्ला शेख, पत्नी सुफी रियाज शेख, मेव्हणी सना उस्मान शेख, मेहरुन शेख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाज मुल्ला हा कॅबचालक होता. त्याचे एप्रिल २०२४ मध्ये सुफी यांच्याबरोबर विवाह झाला होता. लग्नानंतर सासरच्या मंडळीनी रियाज याला वेळोवळी शिवीगाळ तसेच दमदाटी केली. त्यांची पत्नी माहेरी गेली ती परत नांदायला आली नाही. तिने नांदायला यावे, यासाठी रियाज गेला असताना त्याला अपमानास्पद वागणूक दिली. या सततच्या त्रासाला कंटाळून रियाजने शनिवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास लोणीकंद पोलीस करत आहेत.