पुणे : जिल्ह्यातील इंदापूर शहरात असलेल्या श्री मालोजीराजे भोसले यांच्या ऐतिहासिक गडीवरील झालेले अतिक्रमण हटवण्यासाठी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत हिंदू जन आक्रोश मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्च्याला सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला. मोर्चा नेहरू चौकातून मुख्य बाजारपेठेत आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे सकल मराठा समाजाचे आंदोलक जात होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवून दहा आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे.
मोठा पोलीस बंदोबस्त
आज सकाळपासूनच पोलिसांनी इंदापूर शहरात चौका-चौकात मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता. दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास आमदार नितेश राणे इंदापुरमध्ये आले. यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच रामवेस नाका येथून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. इंदापूरचे ग्रामदैवत इंद्रेश्वर मंदिरामध्ये त्यांच्या हस्ते आरती झाली.
दरम्यान, पुढे मोर्चा मुख्य बाजारपेठेतून खडकपुरा या ठिकाणी जात असताना न्यायालयाच्या समोरच्या चौकात थांबलेल्या सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी खडकपुरा चौकाकडे निघताच पोलिसांनी त्यांना मोर्चाकडे जाण्यापासून रोखले. यावेळी आंदोलकांनी जोरजोरात घोषणाबाजी केली. एक मराठा लाख मराठा, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है। नितेश राणे गो बँक ! अशा घोषणा देण्यात आल्या.