नवी दिल्ली : आपल्यापैकी अनेकांकडे क्रेडिट कार्ड असेल पण तुम्ही त्याचा वापर व्यवहारांसाठी करत असाल तर चांगलंच आहे. मात्र, या कार्डचा वापर करताना काही खबरदारी घेणेही गरजेचे आहे. जर तसे केले नाहीतर मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अशा काही गोष्टींची माहिती असणे गरजेचे आहे.
क्रेडिट कार्डचा वापर हा आपल्यासाठी फायद्याचा जरी वाटत असला तरीही त्याचा वापर करताना आणखीनच सतर्कता बाळगावी लागते. तसे न केल्यास आर्थिक फटका बसण्याची जास्त शक्यता असते. बँकेच्या प्रत्येक क्रेडिट कार्डधारकाला त्यांचं कार्ड वापरून एटीएम सेंटरमधून पैसे काढण्याची मुभा दिली जाते. पण हे कोणत्याही परिस्थितीत टाळणं गरजेचंच आहे. कारण, जेव्हा अशाप्रकारे पैसे आपण काढतो तेव्हा त्या प्रत्येक दिवसाचे शुल्क लागू शकते. तसेच त्यात अतिरिक्त व्याजही द्यावे लागते. त्यामुळे रक्कम कमी पण देणंच जास्त असं होऊ शकतं. म्हणून हे टाळावं.
क्रेडिट कार्डचा वापर जर योग्यप्रकारे आणि लक्षपूर्वक केला तर नक्कीच फायद्याचे ठरू शकते. कारण, एखादा व्यवहार आपण केला तर त्याचा परतावा करण्यासाठी किमान 40 ते 50 दिवसांचा कालावधी मिळू शकतो. बँकांच्या बिलिंग सायकलनुसार यामध्ये कमी-जास्त दिवस होऊ शकतात. पण तुम्ही नियमित पैसे फेड करणाऱ्यांमधील असाल तर तुमच्यासाठी क्रेडिट कार्ड फायद्याचे ठरू शकते.