मुंबई : शेजारी राहणाऱ्या अवघ्या ३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर १५ वर्षीय मुलाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम ६३ (बी) आणि ६५ (२) यासह पॉक्सो कायद्याच्या कलम ८ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल करत आरोपी मुलाला राहत्या घरातून ताब्यात घेत त्याची रवानगी डोंगरीतील बालसुधारगृहात केली आहे.
२५ वर्षीय तक्रारदार महिला या कुटुंबासोबत राहातात. त्यांना ३ वर्षांची मुलगी आहे. १५ वर्षीय आरोपी त्यांच्या घराशेजारी राहात असून, तो नियमित त्यांच्या घरी येत होता. मंगळवारी दुपारी तक्रारदार महिला कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. या वेळी त्यांची मुलगी घरात एकटीच होती. दुपारी सव्वाबाराच्या सुमारास आरोपीने त्यांच्या घरी जात मुलीशी अश्लील चाळे करून तिच्यावर लैगिंक अत्याचार केला.
दुपारी दीडच्या सुमारास तक्रारदार या घरी परतल्या असता, मुलीने घडलेला प्रकार सांगितला. महिलेने मुलीला सोबत घेत साकीनाका पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, गुन्हा दाखल करून साकीनाका पोलिसांनी आरोपी मुलाला राहत्या घरातून ताब्यात घेतले. चौकशीअंती मुलाची रवानगी डोंगरीतील बालसुधारगृहात करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.