पुणे : 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची आज घोषणा करण्यात आली. आट्टम चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर आज जाहीर झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांवर मराठी कलाकृतींनी विजेत्यांच्या यादीत आपली छाप सोडली आहे. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार ‘वाळवी’ला देण्यात आला.
70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात प्रत्येक सिनेसृष्टीतील अनेक चित्रपट आणि कलाकारांना नामांकने देण्यात आली होती. आता अखेर विजेत्यांच्या नावाची यादी जाहीर झाली आहे.
अभिनेता स्वप्नील जोशी, अनिता दाते, सुबोध भावे आणि शिवानी सुर्वे यांच्या वाळवी या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या चित्रपटाने राष्ट्रीय चित्रपटावर मोहोर उमटवली आहे. तसेच 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘कंतारा’ चित्रपटासाठी ऋषभ शेट्टी याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर करण्यात आला. ‘कार्तिकेय’ 2 चित्रपटाला सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.
‘पोनियिन सेल्वन 1’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. ‘KGF Chapter 2’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपटाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. ‘केजीएफ चॅप्टर 2’ ला सर्वोत्कृष्ट स्टंट कोरिओग्राफीचा पुरस्कारही मिळाला. मनोज बाजपेयी यांना ‘गुलमोहर’साठी स्पेशल मेन्शन पुरस्कार मिळाला. संजय सलील चौधरी यांना कढीकन चित्रपटातील संगीतासाठी विशेष पुरस्कार मिळाला.
जाहीर झालेले राष्ट्रीय पुरस्कार पुढीलप्रमाणे…
– सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार- मल्ल्याळी चित्रपट आट्टम ला
– सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट – गुलमोहर
– सर्वोत्कृष्ट फिचर फिल्म – सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट – वाळवी
– साहिल वैद्य यांच्या ‘मर्मर्स ऑफ द जंगल’ला दोन पुरस्कार
– साहिल वैद्य यांच्या ‘मर्मर्स ऑफ द जंगल बेस्ट डॉक्यु्मेंटरी पुरस्कार
– ‘मर्मर्स ऑफ द जंगल’ला बेस्ट नॅरेशनचाही पुरस्कार
– सचिन बाळासाहेब सूर्यवंशींच्या ‘वारसा’लाही राष्ट्रीय पुरस्कार
– गायक अर्जित सिंह याला हिंदी चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’ साठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार जाहीर
– हिंदी चित्रपट ब्रह्मास्त्रसाठी संगीतकार प्रीतम यांना सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार
– अभिनेत्री नित्या मेनन हिला तिरुचित्रम्बलम करिता आणि मानसी पारेख हिला कच्छ एक्स्प्रेससाठी संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
– मल्ल्याळी चित्रपट ‘आट्टम’ला सर्वोत्कृष्ट एडिटिंगचा पुरस्कार
– आनंद एकार्शी यांना ‘आट्टम’ करिता सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार
– फौजा चित्रपटासाठी नौशाद सदर खान यांना सर्वोत्कृष्ट गीतकाराचा पुरस्कार
– ‘कंतारा’ चित्रपटासाठी ऋषभ शेट्टी याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार
– वारसा चित्रपटाला बेस्ट आर्ट कल्चरल फिल्मचा पुरस्कार
– आदीगुंजन या मराठी चित्रपटाला सर्वोत्तम निवेदन पुरस्कार, सर्वोत्तम माहितीपट पुरस्कार