लोणी काळभोर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर तिहेरी वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. हा अपघात लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी कॉर्नर येथे शुक्रवारी (ता. 16) पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास झाला आहे. या अपघातात तीन ते चार जण जखमी झाले असून त्यांना एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून सोलापूरकडून पुण्याच्या दिशेने एक लाल रंगाची कार भरधाव वेगाने चालली होती. महामार्गावरून जात असताना, कार लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पुलावर आली असता, कारचा अचानक टायर फुटला आणि कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. कार रस्तादुभाजक ओलांडून पुण्याकडून सोलापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर भरधाव वेगाने गेली. आणि कारने समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रक अख्खा गोल फिरला आणि सोलापूर रोडवरच उलटा फिरून पुण्याच्या दिशेकडे तोंड करून उभा राहिला.
तर याच वेळी पुण्याकडून सोलापूरच्या दिशेकडे चाललेली एक कार ट्रकच्या पाठीमागे होते. हि कार या दोन्ही वाहनांच्या मध्ये सापडली आणि या कारणाने दोन तीन पलट्या मारून कार रस्त्यावर पलटी झाली. या अपघातात तीन ते चार जण जखमी झाले आहे. त्यांना नागरिकांनी लोणी काळभोर येथील एका खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, हा अपघात झाला होता तेव्हा बघ्यांची प्रचंड, मोठी गर्दी केली होती. तर पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सोलापूरच्या दिशेकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. मात्र हा अपघात होऊन 10 मिनिटे झाले तरी वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले नव्हते.